Home Regional परमबीर सिंग यांना High Courtचा दिलासा, जूनपर्यंत अटक नाही

परमबीर सिंग यांना High Courtचा दिलासा, जूनपर्यंत अटक नाही

131
Param Bir Singh

Maharashtra: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh)यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक होणार नाही आहे.

परमबीर सिंग यांच्यावर 24 मेपर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला होता. ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात सिंग यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली. परमबीर सिंग यांचे प्रकरण रेग्युलर कोर्टात चालवले जाणार आहे. परमबीर सिंग यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली. तसंच 9 जूनपर्यंत अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयाला दिली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे आज यावर ऑनलाईन सुनावणी झाली.

नेमकं प्रकरण काय?

अकोला येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलमांतर्गत FIR नोंदवला आहे. त्याला परमबीर यांनी ज्येष्ठ वकील अॅड. महेश जेठमलानी यांच्यामार्फत फौजदारी रिट याचिका करून आव्हान देत एफआयआर रद्द करण्याची किंवा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. भीमराज घाडगे हे 2015 ते 2018 या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयात सेवेत होते.

घाडगे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 2015 मधील हे प्रकरण आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर घाडगे यांनी स्वतःची बाजूही प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात मांडली. सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेले आरोप मागे घ्यावे म्हणून त्यांच्यावर दबाब आणावा या हेतूनं ही तक्रार आतात केलेली नसल्याचं घाडगे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान 2015 ते 2018 या कालावधीत घडलेल्या काही प्रकरणांचा तपास करत असताना ठराविक लोकांना आरोपी न करण्यास सिंग यांनी घाडगे यांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यामुळेच परमबीर सिंग यांनी आपल्याला मानहानीकारक वागणूक दिली. तसंच माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. जातीवाचक शिवीगाळ करत मानसिक छळ केल्याचा आरोप या घाडगे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

शुक्रवारी तब्बल 13 तास सुनावणी

सध्या उन्हाळी सुट्टी सुरु असल्यामुळे उच्च न्यायालयाकडून महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु आहे. त्यातच बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 12 तास सुनावणी पार पडली. न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं शुक्रवारीही तब्बल 13 तास सलग न्यायालयीन कामकाज केले. त्यात रात्री दहाच्या सुमारास परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. मात्र रात्री 12 पर्यंतही सुनावणी पूर्ण झाली नाही म्हणून खंडपीठाने अखेरीस पुढील सुनावणी सोमवारी (24 मे रोजी) ठेवली आणि तोपर्यंत परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश देण्यात आले होते.